Powered By Blogger

दुष्काळ

तहानलेली भूमी माझी 
त्वचेवरच्या भेगा माझ्या 
सुकलेली पानं माझी 
हंबरणाऱ्या गाई माझ्या 

आदित्याचे निरंतर ऊन 
दिला पावसाने दगा 
बळी पडला तो पाणी ओसरून 
आल्या दुष्काळाच्या झळा 

उष्ण वारा मळ्यात वाहतो 
पाऊस आमुचा घेऊन जातो 
रंग माझा चोरून नेला 
हिरव्याजागी पिवळा केला 

रंग घेऊन आली होळी
या वर्षी विसरून पाणी 
प्यायलासुद्धा नाही जल 
होळी खेळायला लागली झळ 

काय हे संकट माझ्यावरती 
लेकरे माझी किती झुंजती 
नाही पाणी नाही  अन्न 
जणू दुष्काळच झाला प्रसन्न 

नाही माते इलाज माझा 
दुष्काळ मजला म्हटला असा 
चिंतित करण्याची नाही मज हौस 
लेकरांची चूक दावण्यास नाही पडला पाऊस 

हे सत्य जरी असले कटू 
माझ्या येण्यामागे आहे हेतू 
पाण्याचा गैरवापर न करावा 
जल हे अनमोल हा संदेश पोचवावा 

जीवनदाता म्हणजे तोय 
धरणीमातेचे अमृत होय 
जप्त केल्याविना लक्षात न येई 
अमर्याद पाण्याची महती ही 

पाण्यासाठी आम्ही गरजू 
जाणून घेतली चूक आमची 
पाणी आता जपून वापरू 
ओळखली महती पाण्याची 

चूक तुम्हा दावली मानवा 
निघेन मी परी खात्री बाळगा 
विसरल्यास शिकवण ही 
झळा घेऊन येईन पुन्हा मी 

म्हणोनि असे आला पर्जन्य 
घेऊनि संगे नवे चैतन्य 
दुष्काळाने घेतली रजा 
पावसाने केला गाजावाजा!