'सांगितलेलं कळत नाही का? कुठल्या भाषेत सांगू म्हणजे कळेल?' एकदा न कधीतरी कुणीतरी आपल्याला असं म्हटलेलं असतं. किंबहुदा आपणच असं म्हटलेलं असतं रागाच्या भरात. तेव्हा आपल्या मनात काय असतं आणि वस्तुस्थिती काय असते ह्यात फरक असतो. खरंतर समोरच्याला सगळं कळत असतं, हे रागवणाऱ्यालादेखील मनाच्या एका कोपऱ्यात माहित असतं. तरी त्याच्या तोंडून 'कळत नाही का?' असे शब्द निघतात. ओरडा खाणाऱ्याला तर ठाऊकच असतं, की आपल्याला ह्याचं म्हणणं कळलंय तर खरं पण वळलं नाहीये. पण असं का होतं? कळतं पण वळत नाही.
कधी कधी असे होते, सांगितलेले कळते पण पटत नाही. मग वळायचा तर कुठे प्रश्न येतो? 'जा गच्चीवरून खाली उडी मार.' काय कळले? गच्चीवर जा आणि खाली जमिनीवर उडी मार. काय पटले? काही पटले नाही! उडी मारल्यावर काय परमानंद प्राप्त होणार आहे? मग कशाला उडी मारायची? कळते पण पटत नाही, म्हणून वळतही नाही असा प्रकार घडतो.
पण मग बाकीच्या वेळेला काय? पटतच नाही म्हणून वळत नाही असे सारखे नाही होत. कळते, पटते पण वळत नाही असाही प्रकार बघायला मिळतो. जेव्हा एखादी गोष्ट पटते, त्या गोष्टीचा प्रयोग करून दैनंदिन वर्तनात तिला अंगीकारतो, तेव्हा ती गोष्ट कळली व वळली असे म्हणतात. ती गोष्ट अंगीकारायला कष्ट घ्यावे लागतात व काही बदल घडवून आणावे लागतात. हे करण्यातच माणूस कमी पडतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आळस. आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्य महारिपुम्। आपण कितीही जरी उपयुक्त, संस्कारक्षम, जीवनाला सुखी बनवणारऱ्या अनेक गोष्टी ऐकल्या तरी अंगात आळस असल्यास त्या गोष्टी व्यर्थ जाऊ शकतात.
किंतु आळसाव्यतिरिक्त माणसाची अजून एक वृत्ती ह्याला कारणीभूत ठरते. माणूस त्याच्या आयुष्यात जवळपास कुठल्याही बदलला पहिल्या विचारात नाकारतो. असे का बरे? एखाद्या गोष्टीत त्याची गती असली की दिशा बदलल्यावर परत मंद गतीने सुरूवात करावी लागते. नवीन परिस्थिती अंगवळणी पडायला वेळ लागतो. हे त्याला पसंत पडत नाही. त्यापेक्षा आताचीच दिशा, आताचीच परिस्थिती बरी. म्हणून गाडी 'वळवायची' कशी हे जरी कळले तरी तो प्रत्यक्षात खरच 'वळवेल' की नाही ह्याची खात्री नाही.
ही खात्री एकच गोष्ट पटवून देऊ शकते. ती म्हणजे माणसाची इच्छाशक्ती. त्या माणसाची बदल घडवून आणण्याची इच्छा असेल तरच त्याचा आळस आणि ही वृत्ती दूर होईल. 'माझ्या आयुष्यात हे परिवर्तन मी घडवून आणणारच' असा निर्णय जर आपणहून घेतला, स्वतः जिद्द दाखवली ~ दुसऱ्यांनी सांगितले म्हणून नाही ~ तरच एखाद्याची प्रगती होऊ शकेल. आणि जर ही जिद्द संपूर्ण राष्ट्रात निर्मिली तर? तो का नाही राष्ट्राची पुढारी होणार?
