Powered By Blogger

पिंजरा

आपले मन पिंजऱ्यासारखे आहे. या पिंजऱ्यात आहेत बंदिस्त विचारांचे पक्षी जे प्रत्येक क्षणी बाहेर पडण्यास तडमडत असतात. स्वातंत्र्यासाठीची ही आवड असणारे पक्षी आपण आपल्या भावना व्यक्त करून, विचार मांडून सोडवू शकतो. या पक्ष्यांना मुक्त सोडल्यावर आपले मन मोकळे व हलके वाटते, त्याचे दडपण येत नाही. पण जर आपण या भावनांना, या विचारांना पिंजऱ्यातच कोंडून ठेवले तर? अर्थाथच ते बाहेर पडण्यासाठी धडपडतील. पिंजऱ्यातले पक्षी संख्येने वाढत जातील व पिंजऱ्याचे ओझे वाढेल. या प्रकारे जर एखाद्याने त्याचे विचार आणि भावना गुप्त ठेवले तर त्याला मनी गुदमरल्यासारखे जाणवेल. या भावना मनात राहून राहून मनाला त्रस्त करू शकतात नि मग जग माणसांशिवाय वाटू लागते. या पिंजऱ्यातले पक्षी वाढले कि ते जणू आपल्यालाच पिंजऱ्यात टाकतात. असे होऊ नये म्हणून त्या पक्ष्यांना मधून आधून बाहेर सोडायला हवे. विचारांची देवाणघेवाण करायला हवी. तेव्हाच ते पक्षी बाहेर पडतील आणि आनंदात राहतील. या पक्ष्यांचा आनंद म्हणजेच आपला आनंद होय.