आपल्या आयुष्यात अनेक मित्र बनून जातात. या संदर्भात मित्र म्हणजे
अर्थाथच माणूस. कोणत्याही माणसात काही चांगले गुण असतात, तर काही वाईट
गुणही असतात. मित्रांशी दैनंदिन जीवनात बोलत असल्याने, संवाद साधत
असल्याने, आपण त्यांच्यात असलेल्या चांगल्या वाईट गुणांना बऱ्यापैकी ओळखतो.
बऱ्याच वेळेला आपण त्यांच्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करतो, जे केल्याने
त्यांचे चांगले गुण जास्त दिसून येतात. पण कधी कधी सभोवताली अशी परिस्थिती
निर्माण होते, ज्यात आपल्या मित्रांचे वाईट गुण दिसून येतात जे पाहून मनाला खुपते. या खुपण्याला आपण नकारात्मक दृष्टीने जर पाहत राहिलो, तर मनात
"आपल्याकडे चांगले खरे मित्रच नाहीयेत, आपल्याला चांगला मित्र शोधायला हवा,
आपल्याला चांगला मित्र मिळतच नाहीये" अशे विचार येउन मनाला उदास करू
लागतात. माझ्या मित्राचे असेच काही झाले होते.
एकदा आम्हची सहज रोजची गपशप चालली होते, तेव्हा त्याने मला त्याचे उदास
असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चांगला 'परिपूर्ण' मित्र नव्हता, असे तो
म्हणाला. त्याला थोडक्यात असे म्हणायचे होते की त्याच्याकडे असा मित्र
नव्हता, कि जो चांगला वागणारा असेल, त्याला मदत करणारा असेल, त्याचे विचार
नीट समझून घेणारा असेल, वगैरे वगैरे. तो म्हणाला कि त्याने असा मित्र
शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला असा मित्र मिळालाच नाही. हे ऐकून मी
त्याला म्हणालो कि असा 'परिपूर्ण' मित्र मिळणं अशक्य आहे. माणसात काही न
काहीतरी अनिष्ट गुण असतातच, ज्यामुळे असा मित्र कितीही जरी शोधला तरी
मिळणार नाही. मग मी त्याला ह्यावर एक इलाज सांगितला.
मी त्याला म्हणालो,
"तुझ्या कडे खूप सारे मित्र असतील."
तो म्हणाला हो.
"तू त्यांच्यातले चांगले वाईट गुण ओळखलेच असतील."
तो परत म्हणाला हो.
"त्यांच्यातले
वाईट गुण बाजूला कर आणि चांगल्या गुणांकडे लक्ष दे. हे सगळे चांगले गुण तू
एकत्र कर आणि एक 'परिपूर्ण' मित्र बनव. ह्या मित्रात काहीच वाईट
अनिष्ट गुण नसतील. हा बनेल तुझा परिपूर्ण मित्र, जो तुला कायम सुखी ठेवेल
जसे त्याने मला सुखी ठेवले. तुला जर एखादी गोष्ट त्याला सांगायची असेल, तर
त्याच्यातला विश्वासू गुण पहायचा आपल्या कोणत्या मित्रात आहे, ज्या मित्रात
हा गुण तुला दिसेल त्या मित्राला तू ही गोष्ट सांगू शकशील."
असं सांगून मी त्याला एका नवीन मित्राशी ओळख करून दिली.
*आशुतोष*
